शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी नगरांची लोकसंख्या मर्यादित होती. त्या वेळी जवळ जवळ सर्वत्रच प्रातर्विधी मोकळ्या जागेत करण्याची पद्धत होती. तसे पाहता ते सोयीचेही होते. गावे जरी नदी, नाल्याकाठी वसलेली तरी हे विधी सामान्यतः नदीपासून दूर केल्या जायच्या. मात्र वाढत्या लोकसंख्येसोबत गावे, शहरे फुगत गेली. घराशेजारी संडास झाले. सेप्टिक टॅंक किंवा शोषखड्डे आले.
शहराची वाढ आडवी होण्याऐवजी उभी - बहुमजली इमारतींमध्ये होऊ लागली. मर्यादित जागेत अधिक सांडपाणी तयार होऊ लागले. दुर्गंधी अन् रोगराई टाळण्यासाठी गटारी व त्याही पुढे जात बंदिस्त गटारी आल्या. त्यांचे आकारमान वाढल्यावर पुढे सिवरेज लाइन्स आल्या. आपले घर परिसर आणि शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी हा प्रवास होत गेला तरी हे वाढलेले सांडपाणी परिसरातील पाण्याच्या प्रवाहात सोडले जात होते. कारण ते सर्वांनाच सोयीचे वाटत होते.
त्याची कारणे सामान्यतः पुढीलप्रमाणे...
१) त्या काळी नद्या, नाले बारमाही वाहत्या असत. त्यातून वाहणाऱ्या शुद्ध पाण्याच्या तुलनेत सांडपाणी खूप कमी असल्यामुळे सांडपाण्याचा नकारात्मक परिणाम कमी होता.
२) पूर्वी सांडपाण्यामध्ये बहुतांश सेंद्रिय घटकच असत. मैल्यासोबत अंगाचे व धुण्याचे साबणही बऱ्यापैकी सेंद्रिय व नैसर्गिक वनस्पतिजन्य घटकांपासून बनवलेले असत. मैल्यातील मूळ सूक्ष्मजीव, पाण्यातील सूक्ष्मजीव, सूर्यप्रकाश या सर्वांमुळे त्या सर्व सेंद्रिय घटकांचे विघटन होई. पाण्याच्या वाहण्याच्या किंवा स्थिरतेच्या प्रमाणानुसार त्याचा वेळ कमी अधिक असे इतकेच. वाहत्या पाण्यात काही अंतरातच पाणी पुन्हा पिण्यायोग्य शुद्ध व्हायचे.
३) जवळपास प्रत्येक छोट्या मोठ्या नद्या किंवा प्रवाहांवर बांध, बंधारे किंवा धरणे झाल्यामुळे प्रवाह ठप्प झाले. ही धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरली तरच पावसाळ्यात या नद्या थोड्याफार वाहत्या असतात. पुढे हे प्रवाह म्हणजे केवळ वाहते सांडपाणी अशीच स्थिती झालेली दिसते. नद्यांमध्ये फक्त सांडपाणीच वाहू लागले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok